सूरत – पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयात झालेल्या 2 वर्षांच्या शिक्षेला आव्हान देण्यासाठी आज काँग्रेस नेते राहुल गांधींनी शक्तिप्रदर्शन करत सूरत सत्र न्यायालय गाठले. बहीण प्रियांका आणि काँग्रेस नेत्यांसोबत बसमधून राहुल कोर्टापर्यंत आले. न्यायालयाने राहुल यांना 13 एप्रिलपर्यंत जामीन मंजूर केला. याच दिवशी पुढील सुनावणी होईल, तर त्यांची शिक्षा रद्द करण्याबाबतच्या आव्हान याचिकेवर 3 मे रोजी सुनावणी घेण्याचे ठरवले.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी आज सकाळी राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तासाभरानंतर राहुल गांधी आपल्या निवासस्थानातून दिल्ली विमानतळाकडे रवाना झाले आणि दिल्लीहून विमानाद्वारे राहुल गांधींसोबत काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि वकिलांची टीमही सुरतेत दाखल झाली. विमानतळावरून त्यांनी एका बसमधून थेट सूरत सत्र न्यायालय गाठले. न्यायालयाच्या परिसरातील रस्त्यावर राहुल गांधींच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी करत स्थानिक कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केले. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार संजय निरुपमांसह अन्य राज्यांतील काँग्रेसच्या नेत्यांनी देखील न्यायालयाच्या आवारात हजेरी लावली होती. न्यायालयाचा परिसर काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भरून गेला होता. तेथील परिस्थिती सांभाळण्यासाठी पोलीस मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते.
सूरत सत्र न्यायालयात राहुल गांधींनी मोदी आडनावावरील वादग्रस्त वक्तव्यावरील मानहानीच्या प्रकरणात सुनावण्यात आलेल्या 2 वर्षांच्या शिक्षेला आव्हान देणारी याचिका दाखल केली. यावर 3 मे रोजी सुनावणी होईल. दरम्यान, जामीन याचिकेवरही न्यायालयाने आज सुनावणी घेत जामिनाची मुदत 13 एप्रिलपर्यंत वाढवली. त्याच दिवशी त्यांच्या जामिनावर सुनावणी घेण्याचे निश्चित केले. सुनावणी संपल्यानंतर राहुल गांधी न्यायालयातून बाहेर येताच तेथील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यावेळी राहुल गांधींनी हात दाखवत त्यांचे अभिवादन स्वीकारले. त्यानंतर राहुल आणि प्रियंका गांधी आपल्या नेत्यांसोबत परत बसमध्ये बसून सूरत विमानतळाकडे रवाना झाले. सूरत महानगर न्यायदंडाधिकार्यांनी 23 मार्च रोजी राहुल गांधींना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले होते. तसेच त्यांना 2 वर्षांची कैद आणि 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यावेळी त्यांना लगेच त्या न्यायालयाने जामीनही मंजूर केला होता. न्यायालयाने त्यांंना शिक्षेला आव्हान देण्यासाठी 30 दिवसांचा अवधीही दिला होता. या शिक्षेनंतर दुसर्याच दिवशी राहुल यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. 3 मे रोजी सुनावणीवेळी जर दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली तरच राहुल गांधींच्या खासदारकीबाबत निर्णय होईल. दरम्यान, कोर्टाच्या सुनावणीनंतर राहुल यांनी ट्विट केले की, ही ‘मित्रकाळा’विरुद्ध लोकशाहीला वाचवण्याची लढाई आहे. या संघर्षात माझ्याकडे सत्य हेच अस्त्र आहे.’
राहुल गांधींना जामीन