नवी दिल्ली – संसदेच्या अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी, भाजपा आणि संघाच्या हिंदुत्वावर जोरदार हल्ला चढवत हिंदू कधी हिंसाचार करत नाही. हिंदू द्वेष पसरवत नाही. हिंदू भीती पसरवत नाही, असे म्हटले होते. त्यांचे हे भाषण गाजत आहे. मात्र लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्या याच भाषणातून अत्यंत महत्त्वाचे मुद्दे कामकाजातून वगळून टाकले. याविरोधात आज राहुल गांधी यांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून वगळलेली सर्व वाक्ये पुन्हा नोंदवावी, अशी मागणी केली आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, माझ्या भाषणातील अनेक महत्त्वाची वक्तव्ये वगळण्यात आल्याचे पाहून मला धक्काच बसला. मी जे बोललो ते नियम 380 च्या कक्षेत राहून बोललेलो आहे. मी जे सांगितले ती वस्तुस्थिती आहे आणि ती मांडणे हे माझे कार्य आहे. जनतेचा आवाज पोचवणे यासाठीच मी या सभागृहात उभा आहे. मी अत्यंत जबाबदारीने केलेली विधाने कामकाजातून वगळणे हे संसदीय लोकशाहीच्या विरोधात आहे. या सभागृहातील प्रत्येक प्रतिनिधीला राज्य घटनेने बोलण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. जनतेच्या व्यथा मांडण्याचा आम्हाला हक्क आहे. त्याचवेळी आपण अनुराग ठाकूर (भाजपा) यांच्या भाषणातील केवळ एक शब्द कामकाजातून वगळला. याचे मला आश्चर्य वाटते. अनुराग ठाकूर यांनी भाषणात असंख्य आरोप केले होते. पण त्यांच्यावर अत्यंत किरकोळ कारवाई झाली. मी पुन्हा एकदा विनंती करतो की, माझ्या संपूर्ण भाषणाची कामकाजात नोंद व्हावी.आज सभागृहात पंतप्रधान मोदी यांनी भाषण केले. त्यांनी आपल्या पूर्ण भाषणात 2014 पूर्वीची परिस्थिती आणि काँग्रेसचा कार्यकाळ यावरच टीकाटीप्पणी केली. त्यांचे भाषण सुरू असताना विरोधक जोरजोरात घोषणाबाजी करीत होते. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संतप्त होऊन विरोधकांना शांत राहण्याचा सज्जड दमही भरला, मात्र विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली.
‘नीट’वर संसदेत चर्चा घ्या
राहुल गांधी यांची मागणी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहून नीट परीक्षेतील गैरव्यवहारावर लोकसभेत उद्या चर्चा घेण्याची विनंती केली आहे. नीट परीक्षा देणार्या 24 लाख विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या मुद्यावर लोकसभेत विधायक चर्चा घडवून आणावी, स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांवर 24 लाख विद्यार्थी आज सरकारला प्रश्न विचारत आहेत त्यांना त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देणे हे आपले कर्तव्य आहे, असे राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.