अहमदाबाद – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर शनिवारी गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. राहुल गांधींचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी राहुल गांधींची बाजू मांडली. राहुल गांधींच्या याचिकेवर पुढील सुनावणी मंगळवारी म्हणजेच 2 मे रोजी होणार आहे. सूरत सत्र न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात राहुल यांना दोषी ठरवण्याला स्थगिती देण्यास नकार दर्शवला. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका राहुल यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत एम. पृच्छक यांच्या न्यायालयात ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी राहुल गांधींच्या वतीने युक्तिवाद केला. राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सिंघवी यांनी सुमारे अडीच तास युक्तिवाद केला.
तसेच राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार्या पूर्णेश मोदी यांच्या वकिलांनी याप्रकरणी काही कागदपत्रे सोपवण्यासाठी वेळ मागितला आहे. त्यावर न्यायमूर्ती म्हणाले की, याप्रकरणी पुढील सुनावणी 2 मे रोजी होईल. न्यायालयाने पूर्णेश मोदी यांच्या वकिलांना सोमवारी सायंकाळपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणाची सुनावणी 2 मे रोजी दुपारी अडीच वाजता जेवणानंतर होणार आहे.
राहुल गांधींच्या आव्हान याचिकेवर पुढील सुनावणी 2 मे रोजी
