मुंबई – काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर राहुल गांधी यांना नेता म्हणून बळ देण्यासाठी एक व्हिडिओ ट्वीट केला. त्यात राहुल गांधींच्या रॅलीची दृश्ये दाखवताना शिवाजी महाराजांवरील शौर्यगीताचा वापर केला आहे. त्यामुळे या व्हिडिओतून राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याचा आरोप करून भाजपने त्याला तीव्र आक्षेप घेत हा व्हिडिओ त्वरित हटवून त्याबद्दल राहुल गांधी आणि काँग्रेसने तातडीने माफी मागावी. अन्यथा आंदोलन करू, असा इशारा भाजपने दिला.
भाजप कार्यकर्त्यांनी आज नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर येथे राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलनेही केली. काँग्रेसने आपल्या अधिकृत हँडलवरून ट्वीट केलेल्या 44 सेकंदाच्या या व्हिडिओला एक-एक करके सब गढ़ जीते, हर दुश्मन से लड़ रण जीते..असे शीर्षक दिले आहे. यात राहुल गांधीं हे लढवय्ये नायक असल्याचे दाखवले आहे. सोबत छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे ‘छत्रपती वीर शिवाजी चमके’ हे हिंदी गाणे वापरले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशाचा फायदा घेत राहुल गांधी यांची प्रतिमा संवर्धन करण्याचा प्रयत्न काँग्रेसने यातून केला आहे. मात्र, राहुल गांधींचा थेट शिवाजी महाराजांशी संबंध जोडल्याचा आरोप भाजपने केला आहे. काँग्रेसने हा आरोप साफ फेटाळला आहे.
या व्हिडिओवर संताप व्यक्त करत हा व्हिडिओ तातडीने डिलीट करण्याची मागणी भाजपने केली. राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे हे वेदनादायक आहे. हा व्हिडिओ डिलीट करून काँग्रेसने माफी मागितली पाहिजे. त्यांनी जर व्हिडिओ डिलीट केला नाही, तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. त्यानंतर बुधवारी राहुल गांधी यांच्या व्हिडिओविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे आंदोलने केली. काही ठिकाणी राहुल गांधी यांच्या पुतळ्याला जोडे मारले. त्याला उत्तर देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले की , राहुल गांधींच्या व्हिडिओचा सत्ताधारी चुकीचा अर्थ काढत आहेत.
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी शिवरायांचा अपमान केला, तेव्हा भाजप गप्प का होती? भाजपाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. उलट राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत, त्यांच्यावर भाजपने नाहक आरोप करणे बंद करावे. महापुरुषांचा अपमान करणार्या भाजप नेत्यांनीच जनतेची माफी
मागायला हवी.
राहुल गांधींची शिवरायांशी तुलना भाजपचा संताप! माफीची मागणी
