कॅराकस – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली यूएस नेव्ही सील कमांडोसह सहा परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. व्हेनेझुएलाचे गृहमंत्री डिओसडाडो कॅबेलो यांनी हा कट अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने रचल्याचा दावा केला आहे.
राष्ट्राध्यक्ष मादुरो यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, यूएस कमांडोशिवाय आणखी दोन अमेरिकन नागरिक, दोन स्पॅनिश आणि एका झेक प्रजासत्ताक नागरिकाला अटक करण्यात आली आहे. याशिवाय ४०० अमेरिकन रायफलही जप्त केल्या आहेत. स्पेनचे राष्ट्रीय गुप्तचर केंद्रही सीआयएसोबत या कटात सहभागी होते. त्यांचे उद्दिष्ट राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्यासह उपराष्ट्रपती आणि इतर अनेक राजकारण्यांना मारण्याचे होते.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्हेनेझुएलाचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की ते अमेरिकन नागरिकांच्या अटकेशी संबंधित आवश्यक माहिती गोळा करत आहोत. स्पेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्हेनेझुएलातून अटक करण्यात आलेल्या नागरिकांशी संबंधित माहितीही मागवली आहे.
व्हेनेझुएलात जुलैमध्ये अध्यक्षीय निवडणूक झाली होती. त्यात मादुरो निवडून आले होते. हा निकाल अमेरिकेसह अनेक दक्षिण अमेरिकन देश फेटाळले होते. व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षांनीही मादुरो यांच्यावर निवडणुकीत हेराफेरी केल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर व्हेनेझुएलाने हा आरोप केला आहे.