मुंबई – आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाची मुंबई विभागीय बैठक झाली. या बैठकीत मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी समीर भुजबळ यांच्यावर सोपवण्यात आली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही घोषणा केली.
या बैठकीत बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, मुंबई म्हणजे आमची मक्तेदारी असा काहींचा समज झाला आहे. हा समज मोडून काढून मुंबईत राष्ट्रवादी पक्ष सशक्त करण्यासाठी समीर भुजबळ यांची निवड केली आहे. गेले दोन महिने प्रदीर्घ चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई ही बहुभाषिक आहे. देशाच्या विविध भागातून इथे लोक येतात. या सर्वांपर्यंत आपल्या पक्षाचे विचार, धोरण पोहचवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी मुंबईत संघटन करणे आवश्यक आहे. या दृष्टीने विचार करून आक्रमक नेतृत्त्व म्हणून समीर भुजबळ यांची निवड केली आहे. येत्या काळात इतरही पदांवर
नियुक्ती होतील.
सुनील तटकरे यांनी या बैठकीत महिला आरक्षणाचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करण्याचा ठरावही मांडला.
राष्ट्रवादी मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळांची नियुक्ती
