बेळगाव – कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागलेले असतानाच या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने अचानक उडी घेतली आहे. आपण स्वबळावर या निवडणुकीत 40 ते 45 जागा लढविणार असे जाहीर करीत शरद पवारांनी आज मुंबईत कर्नाटकातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्यांची बैठकही घेतली. मात्र ही सर्व लगबग कर्नाटकात भाजपाला मदत करण्यासाठी सुरू झाली आहे, अशी जोरदार चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची एकूण देशभरातील मतांची टक्केवारी कमी झाल्याने त्यांचा राष्ट्रीय पक्ष असण्याचा मान गेला. लक्षद्विपमधील त्यांची टक्केवारी मान्य केली गेली नाही. कारण लक्षद्विप हा केंद्रशासित प्रदेश आहे. राष्ट्रीय पक्षाचे स्थान गेल्याने राष्ट्रवादीला दिल्लीतील पक्ष कार्यालयही रिकामे करण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर मतांची टक्केवारी वाढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटक निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे पक्षाचे नेते सांगत असले तरी प्रत्यक्षात यात फारसे तथ्य वाटत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा केला नाही. मतांच्या टक्केवारीसाठी यावर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करीत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगितले जात आहे. मात्र हे कारण असेल तर आधीच तशी घोषणा का झाली नाही. कर्नाटकात सर्व पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपा, काँग्रेस व जनता दलाने उमेदवारांच्या दोन याद्याही जाहीर केल्या आहेत. तरीही आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची काहीच हालचाल नव्हती. मग अचानक निवडणूक लढविण्याचा निर्णय कशासाठी झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे आणि भाजपाला मदत करण्यासाठी ही रणनीती आहे अशी चर्चा आहे.
कर्नाटकात सध्या भाजपाचे बोम्मई सरकार सत्तेवर आहे, पण भाजपाच्या विरोधात यंदा जोरदार वारे आहेत. त्यातच तिकीट वाटपावरून भाजपात मोठ्या प्रमाणावर बंडाळी होत आहे. त्यामुळे यावेळी भाजपा पराभूत होऊन काँग्रेस सत्तेवर येणार असे चित्र निर्माण झाले आहे. सी व्होटरने नुकत्याच जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 115 ते 127 सीट आणि भाजपाला 68 ते 80 सीट मिळतील, असा अंदाज दिला आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन काँग्रेसच्या मतांची विभागणी व्हावी आणि काँग्रेसच्या सीट पडाव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला ऐनवेळी रिंगणात आणण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीने उमेदवार उभे करून काँग्रेसच्या 30 ते 35 सीट पाडल्या तरी भाजपाला याचा मोठा फायदा होणार आहे. याच दृष्टीने कर्नाटकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घाईने मुंबईत बोलावून आज विशेष रणनीती आखल्याचे सांगितले जाते. कर्नाटकात भाजपा, काँग्रेस आणि जनता दल हे आजवरचे प्रमुख पक्ष आहेत. त्याबरोबर बहुजन पक्ष, कम्युनिस्ट आणि आपचे आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस कुठेच नव्हती. एकूण 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकात भाजपासाठी निवडणूक रिंगणात?
