मुंबई – विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार बंडखोरी करणाच्या तयारीत असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची त्यांच्यावर बारीक नजर आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने उद्या घाटकोपरमध्ये कार्यकर्त्यांचे भव्य शिबीर आयोजित केले आहे. या शिबिराच्या पत्रकात अजित पवार यांचे नावच नाही. त्यामुळे या शिबिराला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीतील गटबाजीही यामुळे उघडकीस आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे बंड करून भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत, अशा बातम्या येत आहेत. आज शरद पवारांच्या संदेश घेऊन राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. मात्र या चर्चेतून अजित पवारांचा पवित्रा बदलला, असे काही दिसले नाही.
शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्या घाटकोपर पुर्वच्या ‘गुरुकुल एज्यूकेशन इन्स्टिट्यूट’मध्ये ‘ध्येय राष्ट्रवादीचे… मुंबई विकासाचे’ या शिर्षकाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर पार पडणार आहे. या शिबिराबाबत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका आणि गटनेत्या राखी जाधव यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे. या पत्रकावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अदिती तटकरे, माजी मंत्री अनिल देशमुख यांची नावे आहे. मात्र अजित पवारांचे नाव नाही. मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगणारे अजित पवार या शिबिराला येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अजित पवार यांचा उद्या पिंपरी चिंचवडमध्ये पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. त्यामुळे अजित पवार या शिबिराला उपस्थित राहणार नाहीत, असे सांगितले जात आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी होणाऱ्या शिबिरात अनेक वक्त्यांची भाषणे होणार आहे. या शिबिरासाठी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २,००० हून अधिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पक्षसंघटनात्मक पुनर्रचना व आगामी मुंबई महानगपालिकेच्या निवडणुकांची तयारी व मार्गदर्शन, हे या कार्यक्रमाचे प्रमुख विषय असतील. याशिवाय महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थिती, महिलांची असुरक्षितता, महागाई, बेरोजगारी, परराज्यात जाणारे उद्योग, महापुरुषांचा अवमान, वोट बँक मिळवण्याच्या नादात लोकांच्या जीवाची पर्वा न करणे, सुशोभिकरण प्रकल्पाच्या अंतर्गत मुंबईचे खरे रूप लपवणे, नागरी सुविधा प्रश्नांवर पूर्णपणे दुर्लक्ष अशा विविध मुद्द्यांवर चर्चा व मार्गदर्शन होईल. मात्र या शिबिरात अजित पवार यांच्या अनुपस्थितीचीच सध्या सगळ्यात जास्त होत आहे.