मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आजपासून मतदारसंघांच्या आढावा बैठकांना सुरुवात झाली. आज कोल्हापूर, नगर, परभणी, बीड, माढा, सातारा, नाशिक, दिंडोरी अशा ९ मतदार संघांचा आढावा घेण्यात आला, तर उद्या कल्याण मतदार संघाचा आढावा घेतला जाणार आहे. दरम्यान नगरमध्ये विखे पाटलांना आस्मान दाखवण्यासाठी खास योजना तयार करण्यात आली असल्याचे समजते.
आज सकाळी मुंबईच्या राष्ट्रवादी भवनात लोकसभा मतदारसंघांच्या आढावा बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीला शरद पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते हजर होते. सुरुवातीला परभणी जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, मतदारसंघातील आजी- माजी लोकप्रतिनिधी महिला पदाधिकारी आदींशी चर्चा करून परभणी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर माढा, सोलापूर, नाशिक, दिंडोरी, सातारा, कोल्हापूर, नगर, बीड आदी मतदारसंघातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील स्थितीचा आढावा घेण्यात आला.