राष्ट्रपती राजवट टाळण्यासाठी केवळ 48 तासांचा अवधी! सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी सर्वच पक्षांची धावाधाव

मुंबई- उद्या सकाळी 8 वाजल्यापासून विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होईल आणि दुपारी 1 वाजेपर्यंत महाराष्ट्रावर कोणाची सत्ता येऊ शकते याचे साधारण चित्र स्पष्ट होईल. यावेळी कोणत्याही एका पक्षाला 145 जागांचे बहुमत गाठता येणार नाही, हे स्पष्ट असल्याने सत्तास्थापनेसाठी जुळवाजुळव करण्यासाठी आज सर्वच पक्षांची धावाधाव सुरू होती. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी 26 नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंतच वेळ आहे. तोपर्यंत बहुमताच्या आकड्याचे पाठिंबा पत्र आणि त्यावर पाठिंबा देणाऱ्या आमदारांची सही घेऊन सत्तास्थापनेसाठी दावा केला नाही तर राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल.
राष्ट्रपती राजवट लागू होऊ नये यासाठी सर्वच पक्षांकडे केवळ 48 तासांचा अवधी आहे. या अवधीत बहुमताच्या आकड्याइतके आमदार एकत्र करून त्यांच्या सहीचे पत्र सादर करायचे आहे. यादृष्टीने काँग्रेस आणि ठाकरे गटाने आजच संभाव्य विजेत्या आमदारांना मुंबईत बोलाविले आहे. 24 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत मविआचे विजयी आमदार विजयी झाल्याचे अधिकृत प्रमाणपत्र घेऊन मुंबईला पोहोचणे गरजेचे आहे. यासाठी काँग्रेसने विदर्भ आणि इतर दूरच्या मतदारसंघातील आमदारांसाठी विशेष विमाने आरक्षित केली आहेत. काँग्रेस आणि उबाठाने या आमदारांना मुंबईत राहण्यासाठी पंचतारांकित हॉटेलही निवडली आहेत. आज शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांनी ऑनलाईन बैठक घेऊन उद्या मतमोजणीवेळी कोणती काळजी घ्यायची याचे महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
मविआचे खासदार संजय राऊत यांनी आज पूर्ण बहुमताचा दावा करीत 165च्या पुढे मविआचे आमदार विजयी होतील, असे सांगितले. शरद पवार यांनी मविआचे 157 आमदार विजयी होतील, असे भाकीत केले. विजय वडेट्टीवार म्हणाले की, आम्ही 160 ते 165 जागा जिंकू. नाना पटोले यांनी सांगितले की, उद्या दुपारी 1 वाजता काँग्रेस नेत्यांची ऑनलाईन बैठक आहे. आज रात्री आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवले आहे त्याठिकाणी ट्रक अथवा दुसरे कोणतेही वाहन आले तरी ते तपासण्यास सांगितले आहे. आम्हाला असे कळले की, प्रेसचे स्टिकर अथवा एखाद्या वाहिनीचे स्टिकर लावून वाहन येऊ शकते. असे एखादे वाहन आले तर तेही आम्ही तपासण्यास सांगितले आहे. मविआच्या सर्वच नेत्यांनी मतमोजणी केंद्रात उपस्थित राहणाऱ्या प्रतिनिधींना आदेश दिला आहे की, फॉर्म 17 घेऊन मगच केंद्राबाहेर पडा. नाहीतर मतमोजणीत नंतर गफलत केली जाऊ शकते.
मविआची ही तयारी सुरू असतानाच महायुतीनेही कंबर कसली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिंदे गटाच्या प्रवक्त्यांची बैठक घेतली आणि उद्या विविध वाहिन्यांवर कोणती प्रतिक्रिया द्यायची याचे मार्गदर्शन केले. शिंदे गटाचे संजय शिरसाट म्हणाले की, आमच्याबरोबर येण्यास अपक्षांना दार खुले आहे. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे. अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी म्हटले की, महायुतीला बहुमत मिळेल हे निश्चित आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी आमची इच्छा आहे. वर्षा बंगल्याकडे कूच करावी, असे आम्हाला सर्वांनाच वाटते. भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस हे आज दिवसभर सागर बंगल्यावर ठाण मांडून बसले होते. अनेक नेते त्यांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर येत होते. महायुतीला बहुमतासाठी आकडा कमी पडला तर बंडखोर आणि अपक्ष यांची साथ घ्यावी लागेल, असे गृहीत धरून या सर्वांशी संपर्क साधण्याची जबाबदारी भाजपाच्या विविध नेत्यांना आज देण्यात आली. दरम्यान, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आज म्हणाले की, मविआ आणि महायुती अशा दोघांकडूनही आम्हाला संपर्क होत आहे. जे सर्वांना घेऊन चालणार असतील त्यांना आम्ही पाठिंबा देऊ.
145 चा आकडा कमी पडला तर अपक्ष आणि बंडखोरांना ज्याप्रमाणे महत्त्व येणार आहे त्याचप्रमाणे छोटे पक्ष आणि आघाड्यांनाही महत्त्व येणार आहे. छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू यांची तिसरी आघाडीही या तयारीत आहे. आम्हीच सरकार स्थापन करणार असे आज बच्चू कडू यांनी पुन्हा म्हटले. तिसरी आघाडीबरोबरच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबडेकर यांनीही आज दावा केला की, आम्ही सत्तेत सहभागी होणार आहोत. आमच्या वाचून सत्तास्थापन होणे शक्य होणार नाही. सत्तेत स्थापन होण्यासाठी मनसेही उत्सुक आहे. याचबाबत चर्चा करण्यासाठी आज मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
2019 सालीही राष्ट्रपती राजवट
गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी जाहीर झाली. कोणत्याही एका पक्षाला 145चा बहुमताचा आकडा गाठता आला नाही.
त्यावेळी भाजपा-शिवसेना युती होती. भाजपाला 105 आणि शिवसेनेला 56 जागा मिळाल्या. त्यांचे मिळून 161 जणांचे बहुमत होऊ शकले असते. पण मुख्यमंत्रिपदावरून त्यांच्यात वाद झाले आणि शिवसेनेने भाजपाला पाठिंबा देण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपा-शिवसेना युतीने सत्तेसाठी दावा केला नाही. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी 54 असा आकडा होता. त्यांनाही 145 चा आकडा गाठता आला नाही.
अखेर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवटीची विनंती केली आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. राज्यपालांनी भाजपाला आमंत्रित केले, पण ते बहुमत प्राप्त करू शकले नाहीत. राज्यपालांनी मग शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादीला बहुमत सिद्ध करण्याचे निमंत्रण दिले. दोन्ही पक्षांना ते न जमल्याने 12 नोव्हेंबरला पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू झाली.
21 ऑक्टोबरला मतमोजणी झाल्यावर जवळजवळ महिनाभराने 22 नोव्हेंबरला मविआने सत्तेवर दावा सांगितला. पण 23 नोव्हेंबरला पहाटे अचानक देवेंद्र फडणवीस व अजित पवारांचा शपथविधी झाला. हे प्रकरण कोर्टात पोहोचले. 26 नोव्हेंबरला त्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले, पण अजित पवार माघारी फिरले आणि सरकार पडले. अखेर 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top