प्रयागराज – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु उद्या प्रयागराज येथील महाकुंभात उपस्थित राहणार असून त्या संगमावर स्नान करणार आहेत. प्रयागराजमधील विविध मंदिरांमध्ये त्या दर्शन घेणार असून त्या आठ तास प्रयागराजमध्ये थांबणार आहेत.देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु उद्या महाकुंभात सहभागी होणार आहेत. यावेळी त्या संगमावर स्नान करतील व त्यानंतर अक्षयवट व हनुमान मंदिरात दर्शन घेतील. या ठिकाणी राष्ट्रपतींच्या हस्ते पूजा होणार आहे. या दौऱ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत. त्यांचे अक्षयवटचे दर्शन हे देशातील धार्मिक आस्थेला अधिक मजबूती देणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली असून अक्षयवटला अमरत्वाचे प्रतिक समजले जाते. त्यानंतर त्या डिजीटल महाकुंभ अनुभव केंद्रालाही भेट देणार आहेत. राष्ट्रपती संध्याकाळी सहा वाजता दिल्लीसाठी प्रस्थान करणार आहेत. महाकुंभातील चेंगराचेंगरीत अनेक भाविकांचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या होणाऱ्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या आधी अनेक वर्षांपूर्वी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनीही महाकुंभात पवित्र स्नान केले होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुंचे आज महाकुंभात स्नान
