मुंबई – भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. २८ ते ३० जुलै दरम्यान महाराष्ट्रातील विविध ठिकाणी राष्ट्रपती भेट देणार आहेत. या कालावधीत राष्ट्रपती कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतील त्यानंतर त्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २८ जुलैला कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी जाणार असून त्यानंतर लिज्जत पापड कंपनीच्या गोल्डन ज्युबिली वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला वारणानगर येथे उपस्थित राहणार आहेत. २९ जुलैला पुण्यात सिम्बॉयसिस कॉलेजच्या पदवीदान समारंभात मुख्य अतिथी म्हणून त्या उपस्थित राहतील. त्याच दिवशी मुंबईत विधान परिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमालाही त्या उपस्थित राहणार आहेत. ३० जुलैला राष्ट्रपती नांदेड येथे गुरुद्वाराचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर त्या लातूर जिल्ह्यातील उदगीरला रवाना होतील. तेथे बुद्ध विहाराच्या उद्घाटन समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत.