रायगडच्या तळा शहरात हंडाभर
पाण्यासाठी तळपत्या उन्हात पायपीट

रायगड – जिल्ह्यातील ग्रामीण भाग असलेला नवीन तालुका म्हणजेच तळा तालुका समजला जातो.हा तालुका टँकरग्रस्त तालुक्यात मोडतो.त्यामुळे आता दरवर्षी प्रमाणे यंदाही तळा या तालुक्याच्या शहरातील पाणीटंचाईने आपले डोके वर काढले आहे. तळा शहराला आंबेळी व धरण पाणीपुरवठा लाईन या दोन ठिकाणांहून पाणी पुरवठा करण्यात येत असला तरी धरण येथील पाईप गळती झाल्यामुळे सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. परिणामी शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. शहरातील महिलांना तर हंडाभर पाण्यासाठी तळपत्या उन्हात दूरवरील बोअरींगपर्यंत पायपीट करावी लागत आहे.
पाणीटंचाईमुळे काही नागरिकांना नाईलाजाने विकतचे पाणी घेऊ लागले आहेत.तळा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर होऊनही प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारात काही बदल झालेला दिसत नसल्याचा आरोप जनतेतून करण्यात येत आहे. पाणी नियोजनाची जबाबदारी असलेल्या यंत्रणांमधील बेफिकिरी, समन्वयाचा आणि नियोजनाचा अभाव आणि पाण्याच्या पर्याय शोधाकडील दुर्लक्ष केल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.वावे धरणातून तळा शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे,परंतु मंजूर झालेल्या कामांचे केवळ बॅनरच दिसत आहेत.योजनेचे काम काही अजून सुरू झालेले नाही. सध्या सुरु असलेल्या पाणीपुरवठा योजनेत सतत काहीतरी बिघाड होत आल्याने आतापर्यंत लाखो रुपये खर्च केला गेला असल्याचे बोलले जात आहे.

Scroll to Top