लखनऊ- केंद्र सरकार अयोध्येतील राम मंदिर पुढील २०२४ मध्ये जनतेसाठी खुले करण्यासाठी प्रयत्नशील आहे. हे मंदिर अतिभव्य असल्याने त्याची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे या मंदिराच्या सुरक्षेसाठी आपल्या कर्मचार्यांबरोबरच उत्तर प्रदेश पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा यंत्रणा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या आधुनिक तंत्रज्ञानावर ७७ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
डीजीपी राम कुमार विश्वकर्मा यांनी काल अयोध्येतील राखीव पोलिस लाइनमध्ये कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी डीजीपींनी राम मंदिराच्या सुरक्षेबाबत माहिती दिली.पुढील वर्षीपासून राम मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी अयोध्येत उसळणार असल्याने सुरक्षेत कोणतीही गफलत केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मंदिराच्या सुरक्षेसाठी अयोध्येत अनेक वॉच टॉवर बांधले जातील. पोलिस तैनातीशिवाय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुरक्षा अधिक मजबूत करता यावी, यासाठी एक्स-रे मशिन, टेहळणीसह हायटेक उपकरणे खरेदी करण्यात येणार आहेत.