अयोध्या – अयोध्येतील बहुचर्चित राम मंदिराचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. आतापर्यंत या बांधकामावर ८०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. बांधकाम पूर्ण होण्यासाठी आणखी एक हजार कोटी रुपये म्हणजेच एकूण १,८०० कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित आहे.
अयोध्येत राम मंदिर समितीची सध्या बैठक सुरू आहे. आज बैठकीचा दुसरा दिवस होता. त्यावेळी अपूर्ण राहिलेले बांधकाम पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली. त्यावेळी बांधकाम पूर्ण करण्यास १८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे,असे सांगण्यात आले.
मंदिराच्या बांधकामासाठी सुरुवातीपासूनच पुरेशा प्रमाणात मजूर मिळत नाहीत. त्यामुळे बांधकामाला विलंब होत असून एल अँड टी कंपनीकडे मजुरांची संख्या वाढविण्याची मागणी करण्याचा निर्णयही बैठकी घेण्यात आला.
मंदिर समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी सांगितले की, मंदिराच्या बांधकामासाठी ८०० मजूर लावण्यात आले आहेत. ही संख्या दुप्पट झाल्याशिवाय बांधकामाला वेग येणार नाही. किमान दीड हजार मजूर लावण्याची गरज आहे. जोपर्यंत मजुरांची संख्या वाढविली जात नाही तोपर्यंत बांधकाम संथ गतीनेच होत राहील. बांधकाम पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षे लागतील असे सांगितले जाते .