लखनऊ
अयोध्येत राम मंदिराचे युद्धपातळीवर बांधकाम सुरू आहे. या मंदिराच्या खोदकामादरम्यान मूर्ती आणि स्तंभांचे अवशेष सापडले आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी ट्विटरवर प्राचीन अवशेषांचा फोटो शेअर केला आहे. हे सर्व अवशेष एकाच ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. गेल्या 2 वर्षांपासून मंदिराचे बांधकाम सुरू असताना मूर्ती आणि स्तंभांचे अवशेष सापडत होते, अद्याप त्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. मात्र आता चंपत राय यांनी ट्विटरवर अवशेषांच्या फोटोसह पोस्ट लिहिली आहे की, ‘श्री रामजन्मभूमी येथे खोदकामादरम्यान प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहे. यामध्ये अनेक मूर्ती आणि स्तंभांचा समावेश आहे.` ट्रस्ट राम मंदिर परिसरात एक संग्रहालय उभारले जाणार असून त्यात हे अवशेष ठेवले जाणार आहेत. यामध्ये 1992 मध्ये सापडलेल्या अवशेषांचा देखील समावेश असेल.
राम मंदिरांच्या खोदकामात मूर्ती-स्तंभांचे अवशेष सापडले
