अयोध्या – अयोध्येच्या राममंदिरात रामलल्लाची मूर्ती घडविण्यासाठी काळा पाषाण शोधून देणाऱ्या एका गरीब मजुराला अद्याप त्याच्या कामाचा मोबदलाही मिळालेला नाही. श्रीनिवास नटराज असे या मजुराचे नाव आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आाहे.
या व्हिडिओमध्ये श्रीनिवास असा दावा करताना दिसतो की, त्याला रामलल्लाच्या मूर्तीसाठी काळा पाषाण शोधण्याचे काम सोपविलेल्या द्विसस्यीय समितीचे अध्यक्ष सुरेंद्र विश्वकर्मा यांनी त्याला मूर्तीसाठी पाषाण शोधण्याचे काम दिले होते.त्याने दगडाचा एक नमुना राजजन्मभूमी ट्रस्टकडे पाठवला होता. तो नमुना मंजूर झाल्यानंतर त्याला खोदकाम करून मोठे दगड काढण्यास सांगण्यात आले.सुमारे ८-९ महिन्यांच्या मेहनतीनंतर त्याने रामलल्ला आणि सितामातेच्या मूर्तींसाठी दोन पाषाण खडकातून कापून काढले. मोठे खडक जमिनीतून उकरून काढण्यासाठी त्याने जेसीबी यंत्राचा वापर केला होता. त्याच्या भाड्यापोटी त्याला एक लाख चाळीस हजार रुपये खर्च करावे लागले. हा खर्च त्याने काही दानशूर लोकांनी केलेल्या मदतीच्या साह्याने केला.
कापून काढलेले दगड त्याने ट्रकमधून अयोध्येला पाठवले. त्याचे काहीही पैसे मंदिर ट्रस्टने त्याला दिले नाहीत. पुण्याचे काम समजून आपण हे काम केले,असेही त्याने सांगितले. मात्र श्रीनिवास याचा हा दावा मंदिर ट्रस्टने फेटाळला .