मुंबई- विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवार 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. असे असूनही अद्याप मविआ आणि महायुती यांची अंतिम उमेदवार यादी निश्चित झालेली नाही. यातच महायुतीचे प्रथमपासून मित्रपक्ष राहिलेल्या रिपाइंला महायुतीने एकही जागा न दिल्याने रामदास आठवले प्रचंड नाराज आहेत. महायुतीत असूनही मला दोन जागांसाठी झगडावे लागते याचे खूप वाईट वाटते, असे पत्रच रामदास आठवले यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.
गेले अनेक दिवस रामदास आठवले हे रिपाइंसाठी मतदारसंघ मिळावा असा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांना महायुतीतून दाद मिळालेली नाही. आजही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. या ठिकाणी त्यांना एका जागेचे आश्वासन देण्यात आले, असे आठवले म्हणतात. देवेंद्र फडणवीस यांना भेटून रामदास आठवले वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले. मात्र त्यांना अनेक तास बाहेर थांबवून ठेवण्यात आले. आतमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक सुरू होती.
रामदास आठवले यांनी चेंबूर आणि धारावी हे दोन मतदारसंघ मागितले आहेत. याशिवाय विधान परिषदेची एक आमदारकी मिळावी अशीही त्यांची मागणी आहे. मात्र त्यांची एकही मागणी पूर्ण करण्यात आलेली नाही. कालपर्यंत त्यांना मतदारसंघ सोडावा याबाबत चर्चाच झालेली नाही. महायुतीने शेकाप, रासप, बविआ, प्रहार आदी छोट्या पक्षांशी वेळोवेळी चर्चा करून त्यांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रिपाइंकडे मोठा जनाधार असूनही रिपाइंशी एकही बैठक झाली नाही. रामदास आठवले म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत मला फक्त केंद्रात एक मंत्रिपद देण्यात आले. पण पक्षाला आणि पक्षाच्या कार्यकर्त्याला काहीही मिळाले नाही. महामंडळावरही आमची वर्णी लागली नाही. गेले दोन लोकसभा निवडणुकीत रिपाइंला असेच डावलण्यात आले होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीतही रिपाइंला उमेदवारी देण्यात आलेली नव्हती. सतत डावलले गेल्याने अत्यंत नाराज होऊन रामदास आठवलेंनी अखेर फडणवीसांना पत्र लिहून आपली नाराजी उघड केली.
रामदास आठवले महायुतीवर नाराज! सतत पाठिंबा देऊनही उमेदवारी नाही
