कोल्हापूर – राधानगरी, शाहुवाडी, गगनबावडा तालुक्यात मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीचे पाणी काल सायंकाळी तिसऱ्यांदा पात्राबाहेर आले. तर राधानगरी धरण ७०.३ टक्के भरले आहे. गेल्यावर्षी पेक्षा यंदा ७७९ मिमी पाऊस जास्त झाला आहे, अशी माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली.
काल रात्री नऊ वाजता जिल्ह्यातील ७५ बंधारे पाण्याखाली गेले, तर, कसबा बावडा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३५ फूट २ इंचापर्यंत गेली होती. राधानगरी धरणातून सध्या १,४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर आलमट्टी धरणातून सुरु असलेला ६५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवून ८० हजारहून अधिक क्युसेक करावा, अशी मागणी पाटबंधारे विभागाने केली आहे. राधानगरी धरणाची पाणीपातळी ३३२.८५ फूट, तर पाणीसाठा ५८.३५ दशलक्ष घनफूट आहे. त्यामुळे हे धरण ७०.३ टक्के भरले आहे. दरम्यान, पंचगंगा नदी इशारा पातळीकडे वाटचाल करू लागली आहे. राजाराम बंधाऱ्यावरील इशारा पातळी ३९, तर धोका पातळी ४३ फुटांवर आहे. काळम्मावाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे.