कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्यातील क्षेत्रात १६ पाणस्थळांवर ५ मे रोजी वन्यप्राणी गणना करण्यात आली. या गणनेमध्ये ५१ रानगवे, ६ अस्वल, ३ रानडुक्कर, ६ सांबर, ४ वानर, ६ रानकुत्रे, १ रानमांजर, ३ मेकर, २ खार, १ खवलेमांजर जवादा, ७ शेखरु व ३ साळींदर आढळून आले. याशिवाय ४ मोर, १२ रानकोंबडी आणि इतर जातीचे ८ पक्षी अशी एकूण ज्ञात-अज्ञात ११८ तृणभक्ष्यी व अन्य वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली. ही संख्या समाधानकारक होती, मात्र यावेळी वाघ व बिबट्या न दिसल्याने त्यांची यात नोंद करता आली नाही.
एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला अभयारण्यात दोन दिवस जास्त पाऊस झाल्याने जंगलातील नाले व अन्य ठिकाणी पाणी भरल्याने पाणवठ्यांकडे वाघ, बिबटे फिरकले नाही. त्यामुळेच वाघ व बिबट्यांच्या गणनेवेळी याठिकाणी आढळून आले नाही. कोल्हापूर मधील राधानगरी अभयारण्य देशभरातन गव्यांच्या दर्शनाकरीता प्रसिध्द असे ठिकाण आहे. या ठिकाणी बफर आणि कोअर असे दोन क्षेत्र आहेत. दरवर्षी बुध्द पौर्णिमेच्या रात्री या ठिकाणी वन्यप्राणी गणनेचा निसर्गानुभय कार्यक्रम पार पडतो. शुक्रवारी बुध्द पौर्णिमेच्या रात्री बफर झोनमध्ये निसर्गप्रेमी, शासकीय संस्था यांच्या माध्यमातून वन्यप्राणी गणना करण्यात आली, तर कोअर झोनमध्ये वन्यजीव अधिकाऱ्यांनी गणना केली. अभयारण्यातील पाणवटे, रस्त्याच्या कडेला अन्य ठिकाणी उभारण्यात आलेल्या मचानी वरून ही गणना सायंकाळी ६ ते सकाळी ६ या कालावधीत करण्यात आली. या गणनेकरिता ३० अधिकारी ,कर्मचारी व १६ स्वयंसेवक उपस्थित होते.