- हायकोर्टाने मुंबई पोलिसांना फटकारले
मुंबई – कोणत्याही परिस्थितीत रात्री १० ते सकाळी सकाळी ६ या कालावधीत लाऊडस्पीकर वापरण्यास मनाई करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निकालाचे पालन केलेच पाहिजे, असा सज्जड दम देत उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना चांगलेच फटकारले.
कांदिवली पूर्व येथील ठाकूर गावातील एका मशीदीतून पहाटे लाऊडस्पीकरवरून येणार्या आवाजाविरोधात आणि पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात अॅड.रिना रिचर्ड यांनी मुंबई उच्च न्यायालयात मे २०२२ मध्ये दुसर्यांदा याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते- डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर काल सुनावणी झाली.या मशिदीजवळ ईएसआयएस रुग्णालय आहे. या मशिदीमधून पहाटे लाऊडस्पीकरचा आवाज येत असल्याच्या तक्रारी करूनही पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत होते.यासंदर्भात सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ देखील पोस्ट करण्यात आले होते.
वास्तविक, यासंदर्भात रिचर्ड यांनी २०१७ मध्ये याचिका दाखल केली होती. त्यावेळी लाऊडस्पीकर काढले होते. पण पुन्हा ते लावण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा ही याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने कोणत्याही परिस्थितीत रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यास मनाई असलेल्या नियमांचे पालन झालेच पाहिजे असे मुंबई पोलिसांना सुनावले. या सुनावणीला प्रभारी पोलीस उपायुक्त डीएस स्वामी न्यायालयात उपस्थित होते.