मुंबई- भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील वाहनांच्या पार्किंग शुल्कामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. दुचाकी पार्किंगसाठी पूर्वी पाच रुपये मोजावे लागत होते, तेथे आता ३० रुपये मोजावे लागणार असून चारचाकी वाहनांना २० रुपयांऐवजी ८० रुपये द्यावे लागणार आहेत. राणीच्या बागेत येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय यापूर्वी २००९ मध्ये घेण्यात आला होता. मागील सुमारे १५ वर्षांमध्ये पार्किंग शुल्कात कोणतीही वाढ केलेली नाही. सध्या या प्राणिसंग्रहायाचे रुप पालटले गेल्याने हे ठिकाण पर्यटकांचे पसंतीचे बनले आहे. दररोज १५ ते २० हजार पर्यटक या उद्यानाला भेट देतात. तर सुट्टीच्या दिवशी हा आकडा ३५ हजारांपर्यंत जातो. या पर्यटकांपैकी बहुतांश लोक हे दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन येतात. शाळांच्याही अनेक सहली येत असल्याने येथील वाहनतळाची सुविधा अपुरी पडत आहे.सध्या असलेल्या वाहनतळाच्या जागेत फक्त १०० ते १२० वाहने उभी करता येतात. त्यामुळे या प्राणिसंग्रहालयात आता अतिरिक्त वाहनतळाच्या सुविधेची मागणी केली जात आहे.
राणीच्या बागेच्या पार्किंग शुल्कात वाढ
