मुंबई – राज ठाकरे मोदी शहांची तळी उचलतात अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. काल राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांनी गॅलरीत बघून बोलू नये, त्यांनी सभागृहात, मुख्य मैदानात काय चालले आहे यावरून बोलावे. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची होती. हीच शिवसेना एकनाथ शिंदेंच्या घशात घालणारे मोदी – शहा कोण? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित करायला हवा होता. शिवसेना कोणाची हे सांगण्यासाठी राज ठाकरे यांच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. आज राज ठाकरे फडणवीस, अमित शहा आणि मोदी यांना आपले नेते मानतात. त्यांनीच ही बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी बेकायदेशीरपणे एकनाथ शिंदे यांना दिली. त्याच भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आपण महाराष्ट्रात करायला निघाला आहात.
राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे कधीही माफ करणार नाहीत. राज ठाकरे हे मोदी आणि शहा यांच्या पालख्या वाहत आहेत. ते मूळ मुद्दा सोडून बोलत आहेत. ते काय बोलतात, यावर महाराष्ट्र चालत नाही. राज ठाकरे यांना महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री करायचा आहे आणि तोच महाराष्ट्राचा शत्रू आहे. त्यामुळे राज ठाकरे काय बोलतात, याकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता नाही. अमित ठाकरे यांच्या माहीम उमेदवारी बद्दल राऊत म्हणाले की,दादर, माहिम, प्रभादेवी हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे उमेदवार सावंत हे दहा ते पंधरा हजार मतांनी विजयी होतील. माहीम मतदार संघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा पराभव होईल.
तर रश्मी शुक्ला यांच्या बदलीबद्दल प्रतिक्रिया देत राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली . त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात सध्या बेकायदेशीर सरकार असून अनेक नियुक्त्या बेकायदेशीरपणे झाल्या आहेत. ज्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत ते अधिकारी तुरुंगात जाण्याऐवजी खुले फिरतात. आता देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या ताई यांना राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या पदावरुन हटवण्यात आले. एवढ्या मोठ्या पदावर कोणाला बसवायचे आहे हे जर गृहमंत्र्यांना कळत नसेल तर गृहमंत्र्यांना प्रशासन कळत नाही , नैतिकता कळत नाही असा अर्थ होतो .आम्ही निवडणूक आयोगाचे आभारी आहोत त्यांनी उशिरा का होईना योग्य निर्णय घेतला. आम्ही गेले चार महिने रश्मी शुक्ला यांची तक्रार करत होतो . परंतु त्यांच्यावर कारवाई झाली नाही.