नवी दिल्ली – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला. बोकारो येथील न्यायालयाने कथित भडकावू भाषण केल्याप्रकरणी बजावलेले समन्स दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द केले. मात्र, विश्वास आणि धर्माचे पालन अधिक सावधपणे करावे लागते. त्याद्वारे एखाद्या व्यक्तीच्या विचारांना धक्का लावता येत नाही किंवा चिथावणी दिली जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
भारताची एकता त्याच्या विविध धर्म, श्रद्धा आणि भाषांच्या सहअस्तित्वात पाहायला मिळते. त्यातही धर्म आणि श्रद्धा हे तर शतकानुशतके टिकून आहेत आणि राहतील. ते मानवासारखे नाजूक नाहीत, अशी टिप्पणी न्यायमूर्ती जसमीत सिंह यांनी केली. एका वेगळ्या आदेशात, न्यायाधीशांनी ठाकरे यांना धनबाद न्यायालयाने भारतीय दंड संहितेअंतर्गत खून, दंगल आणि द्वेषपूर्ण भाषण या कथित गुन्ह्यांसाठी बजावलेले समन्स रद्द केले. हे प्रकरण 2008 मधील राज ठाकरेंच्या भाषणाशी संबंधित आहे. राज ठाकरेंनी छठपूजेला नाटक आणि संख्याबळाचे शक्तिप्रदर्शन असे म्हटले होते. छठपूजा हा हिंदूंचा सण आहे आणि तो विशेषतः बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये साजरा केला जातो. उच्च न्यायालयात ठाकरे यांची बाजू ज्येष्ठ वकील अरुणाभ चौधरी आणि अनुपम लाल दास यांनी मांडली. या कथित वक्तव्याशी संबंधित अनेक प्रकरणे नंतर सर्वोच्च न्यायालयाने विविध राज्यांतून दिल्लीतील न्यायालयात वर्ग केली.
राज ठाकरेंना हायकोर्टाचा दिलासा भडकावू भाषणाबद्दलचे समन्स रद्द
