मुंबई – मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी माहीम मजार आणि सांगलीच्या कुपवाड येथील मशीद निर्माणाविरुद्ध आवाज उठवला. त्यानंतर रात्र उलटते न उलटते तोच प्रशासनाने विद्युत वेगाने हालचाल करीत उजाडताच माहिमच्या मजारवर थेट बुलडोझरच फिरवला. कुपवाडच्या अनधिकृत बांधकामाची मोजणी करायला नगररचना विभागाचे अधिकारी सकाळीच धावत आले. हे बांधकामही नंतर पाडण्यास सुरुवात करण्यात आली. याशिवाय राज यांच्यावर इस्लामपूर कोर्टाने बजावलेले अजामीनपात्र अटक वॉरंट मुंबई उच्च न्यायालयाने आज रद्द केले. त्यामुळे राज ठाकरे यांचे मनसे इंजिन आज सुस्साट होते. सरकारी खाती थक्क करणार्या विद्युत वेगाने काम करताना दिसली.
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी माहीम दर्ग्याजवळ समुद्रात अनधिकृत मजार बांधल्याचे ड्रोनच्या सहाय्याने केलेले चित्रीकरण दाखवत हे बांधकाम न पाडल्यास त्याच्याशेजारी गणपती मंदिर उभारण्याचा इशारा दिला. त्यानंतर रात्रीच हालचाल सुरू झाली. ही मजार ज्या जागेवर आहे ती जिल्हाधिकार्यांची जागा आहे असा ताबडतोब शोध लागला. मग आणखी वेगाने हे बांधकाम पाडण्याची ऑर्डर झाली. रात्र उलटताच सकाळी आठ वाजता मुंबईच्या जिल्हाधिकार्यांनी तत्काळ मुंबई महापालिकेच्या सहा अधिकार्यांचे पथक डझनभर कामगार आणि जेसीबी घेऊनच पूर्ण तयारीनिशी माहीम दर्ग्याजवळ पाठवले. मगदूम शाह बाबा दर्गाहचे ट्रस्टी सोहेल खंडवानी यांनी दावा केला की, या जुन्या मजारची वक्फ बोर्डाकडून अधिकृत नोंदणी केलेली आहे. ही जागा 600 वर्षे जुनी आहे. तिथे दर्गा उभारण्याचा आमचा कुठलाही विचार नाही. मात्र त्यांचे न ऐकता मजार व त्याभोवतीचे अनधिकृत बांधकाम जेसीबीने जमीनदोस्त करण्यात आले. माहिमकडे येणार्या सर्व रस्त्यावर प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवला होता. जेसीबीने बांधकाम पाडण्याचे काम सकाळी साडेनऊ वाजता पूर्णही झाले. आता या पाडकामाची उद्या सदा सरवणकर पाहणी करणार आहेत. त्याआधी भाजपा नेते बावनकुळे यांनी शिंदे सरकार आणि राज ठाकरेंचे कौतुकही केले.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया देताना उद्धव सरकारवर खापर फोडत म्हटले की, हे अनधिकृत बांधकाम कोरोना काळात झाले. मविआ सरकारने त्याला मुभा दिली. इतक्या मोठ्या प्रमाणावर भर समुद्रात बांधकाम सुरू आहे आणि त्याची पालिका आणि पोलिसांना माहिती नाही, हे शक्य नाही. बांधकाम होत असताना प्रशासन ठप्प होते. भोंग्यावेळीही उद्धव ठाकरेंनी बोटचेपी भूमिका घेतली. मात्र, आता शिंदे-भाजप सरकारने तत्परता दाखवली तर त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.
मुंबईत ही अति वेगवान कारवाई होत असताना सांगलीतील कुपवाडमध्ये मंगलमूर्ती कॉलनीजवळ अनधिकृत मशीद बांधली जाणार आहे त्या जागेचीही आज सकाळीच नगररचना विभागाने पाहणी करून मोजणी केली. तेथेही नंतर पाडकाम सुरू केले. येथे अनधिकृत मशिदीचे बांधकाम सुरू होते. यासंदर्भातील बातमी आणि छायाचित्रे राज ठाकरे यांनी मेळाव्यात दाखवली होती. नगररचना विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी येथे आले तेव्हा पोलीस बंदोबस्त, दंगलविरोधी पथकही तैनात करण्यात आले होते. मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, भाजपा, शिवसेनेचे नेते, कार्यकर्तेही येथे येऊन पाहणी करून गेले आणि ज्या कुटुंबाला मारहाण झाली त्यांची भेट घेतली.
दरम्यान, राज ठाकरे यांनी मुस्लीम धर्मीयांच्या भावना दुखावल्या असे म्हणत पिंपरी चिंचवड येथे वाजिद शेख यांनी तक्रार दाखल केली आहे.
राज्यातील दोन ठिकाणच्या या मुस्लीम धर्मीयांच्या अनधिकृत बांधकामावर त्वरित कारवाई झालीच, पण याशिवाय उच्च न्यायालयाचा आणखी एक मोठा दिलासा राज ठाकरे यांना मिळाला. सांगलीतील परप्रांतीयांच्या विरोधातील आंदोलनाला चिथावणी दिल्याच्या आरोपावरून राज यांच्यावर खटला सुरू आहे. या प्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करून दोषमुक्तीसाठी राज ठाकरेंनी केलेल्या अर्जावर पुन्हा नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने इस्लामपूर सत्र न्यायालयाला दिले. सांगलीमधील आंदोलनाला आपण चिथावणी दिली यात तथ्य नाही, घटनेवेळी आपण अटकेत होतो, त्यामुळे चिथावणी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा दावा राज यांनी याचिकेतून केला होता. या प्रकरणात दोषमुक्त करण्यासाठी राज ठाकरे यांनी 2013 मध्ये अर्ज दाखल केला होता. हा अर्ज इस्लामपूर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने 27 ऑक्टोबर 2021 रोजी फेटाळला होता. त्यानंतर राज यांनी 11 जुलै 2022 रोजी पुन्हा नव्याने केलेला अर्जही 15 ऑक्टोबर रोजी फेटाळण्यात आला. त्याविरोधात राज यांनी इस्लामपूर सत्र न्यायालयात केलेली याचिकाही 3 फेब्रुवारी 2023 रोजी फेटाळत अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. हे अजामीनपात्र अटक वॉरंट आज मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले.
राज ठाकरेंचे इंजिन सुस्साट! थक्क करणारा वेग