जालना – विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारला शेवटची संधी आहे आणि येत्या दोन दिवसांत मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्यांची अंमलवजावणी करावी, नाहीतर मराठ्यांचे कल्याण न होऊ देण्याचे फडणवीस दोषी असतील, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.
जालन्यामध्ये सुरू असलेल्या त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस होता. मात्र आज त्यांची प्रकृती खालावली. सकाळी आरोग्य विभागाच्या डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली. यावेळी त्यांची साखरेची पातळी खाली असून ब्लड प्रेशर आणि ऑक्सिजनची पातळी योग्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जरांगे यांचा अशक्तपणा वाढला असल्याने त्यांना उपचार घेण्याची विनंती यावेळी डॉक्टरांनी केली. मात्र त्यासाठी त्यांनी नकार दिला. यावेळी मराठा आरक्षणावरून त्यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला.
जरांगे म्हणाले की, एक वर्ष झाले, आम्ही सरकारला सहकार्य करत आहोत. अजून किती दिवस तुम्हाला सहकार्य करायचे? फडणवीसांनी आमच्या मागणीची तातडीने अंमलबजावणी केली पाहिजे. आमच्या व्याख्येप्रमाणे सगेसोयरेची तातडीने अंमलबजावणी केली पाहिजे. हैद्राबादसह सातारा, बाँम्बे ही तिन्ही गॅझेट दोन-तीन दिवसांच्या आत लागू करा. ही सरकारची जबाबदारी आहे. मी राजकीय भाषा बोलत नाही, मात्र माझ्या मागण्या दोन दिवसांत पूर्ण करत नाही, तर येत्या काळात तुम्हाला अवघड दिवस असणार आहेत. फडणवीसांना संधी दिली आहे, त्यांनी आमच्या मागण्यांकडे विशेष लक्ष द्यावे, नाहीतर मराठ्यांचे कल्याण न होऊ द्यायला फडणवीस दोषी असतील. गरिबांवर, मराठ्यांवर अन्याय करणारा फडणवीसच आहे, आम्हाला राजकारणाशी देणेघेणे नाही, पण नंतर मला पाडापाडी कशी झाली? उभे कसे केले? असे म्हणायचे नाही. या दोन-तीन दिवसांत सर्व विषय मार्गी लावा. फडणवीसांनी संधी दिली त्याची सोने करावे. धनगर, मुस्लिम, शेतकरी यांना सरकारने नुसते वेड्यात काढले आहे. मागणी मान्य करा, नाहीतर २०२४ मध्ये राजकीय करिअर उद्ध्वस्त करून टाकेन?
अंतरवालीत ओबीसी
बांधवांचे उपोषण सुरू
ओबीसी बांधवांनीही आज अंतरवाली सराटीतल्या शिंगारे वस्तीत गनिमी काव्याने आमरण उपोषण सुरु केले. मंगेश ससाणेंसह सहा जण उपोषणाला बसले आहेत. सरकार अंतरवाली सराटीला रेड कार्पेट देत त्यांचा लाड करते. सर्व अधिकारी, मंत्री इथे येतात. म्हणून आम्हीही अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलो आहोत. सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी नको आणि बोगस कुणबी दाखले रद्द करावेत, अशी मागणी मंगेश ससाणेंनी केली. अंतरवाली सराटीकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले असून मोठा फोजफाटा तैनात केला आहे.
राज्य सरकारला शेवटची संधी! मनोज जरांगे-पाटलांचा इशारा
