नाशिक- पोलीस भरती प्रक्रियेसाठी आर्थिक दुर्बल घटकातून (ईडब्ल्यूएस) अर्ज केलेल्या मराठा उमेदवारांच्या निवडीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. उर्वरित उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश अप्पर पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. यासंदर्भात अप्पर पोलीस महासंचालकांनी संबंधित विभागांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात नमूद केले आहे की, मराठा आरक्षणाचा अंतिम निर्णय न झाल्याने हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यातील नाशिक जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. मैदानी चाचणी होऊन लेखी परीक्षा पार पडली आहे. त्यानंतर अंतिम निवड यादीही जाहीर झाली. मात्र पोलीस भरतीसाठी मराठा समाजाच्या उमेदवारांनी आर्थिक दुर्बल प्रवर्गातून पोलीस भरतीसाठी अर्ज केल्याने निर्माण झालेला पेच अजूनही कायम आहे. मराठा उमेदवारांच्या नियुक्ती बाबत धोरण निश्चितीसाठी अप्पर महासंचालकांची शासनाला विनंती केली आहे. अशातच शासननिर्णय होईपर्यंत ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्याऐवजी तात्पुरती स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला. याआधी अप्पर महासंचालक कार्यालयाकडून ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय (एसईबीसी) अथवा खुल्या प्रवर्गाची निवड करण्यास सांगितले होते. मात्र नाशिक जिल्हयातील तात्पुरत्या निवड यादीतील ईडब्ल्यूएस प्रवर्गातील ६ पैकी ४ मराठा उमेदवारांनी हमीपत्र देण्यास नकार दिला. अप्पर महासंचालकांच्या नव्या आदेशाने या उमेदवारांची भरती रद्द न होता, तात्पुरती स्थगित करण्यात आल्याने मराठा उमेदवारांना थोडा अंशी दिलासा मिळाला आहे.