अहमदनगर – महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार ते अति मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुणे, कोल्हापूरमध्ये पूरस्थिती तयार झाली होती. आता राज्यातील पावसाचा जोर थोडासा कमी झाला असून पूरस्थिती निवळली आहे. मात्र ५ ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाची संततधार सुरूच राहणार आहे, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
पंजाबरावांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, उद्या राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. पावसाचा जोर पुढल्या महिन्यातही कायम राहणार आहे. या काळात काही भागात रिमझिम पाऊस पडणार, कुठे मुसळधार पाऊस पडणार, तर कुठे अतिवृष्टी सारखा पाऊस पडणार आहे. कोकण, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि पूर्व विदर्भातील सहा तसेच पश्चिम विदर्भातील पाच अशा एकूण १४ जिल्ह्यांमध्ये ३ ऑगस्टपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.