नाशिक – राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले असून, 30 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागलेली आहे. पुणे आणि जळगावमध्ये शिंदे गटाकडून बोगस मतदान होत असल्याचा आरोप करत अपक्ष उमेदवाराने थेट मतदान केंद्राबाहेर गोंधळ घातला होता. तर या निवडणुकीत नाशिकमध्ये एका पॅनलकडून मतदारांना थेट फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याचे समोर आले. याबाबत प्रतिस्पर्धी पॅनलकडून चौकशीची मागणी करण्यात आली.
बारामतीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 97.36 टक्के मतदान झाले. तर नीरामध्ये 99 टक्के, दौंड 99 टक्के, इंदापूरमध्ये 96. 23 टक्के आणि वाशिममध्ये 97.56 टक्के मतदान झाले. राज्यात आज सकाळी 8 वाजेपासून ठिकठिकाणी मतदानाला सुरुवात झाली होती. पुणे आणि जळगावमध्ये बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला व तातडीने मतदान थांबवावे, अशी मागणी केली होती. बोगस मतदान होत असल्याचे सांगूनही अधिकारी आमचे ऐकत नाहीत, ते सरकारच्या दबावाखाली आहेत, असा आरोप अपक्ष उमेदवाराकडून करण्यात आला. यावेळी सरकारी अधिकार्यांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. धुळे येथे मतदान केंद्राबाहेर भाजप आणि मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि माजी मंत्री भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या पॅनलमध्ये अटीतटीची लढत होती. बारामतीसह पुरंदर भागात पावसाने हजेरी लावल्याने मतदारांची तारांबळ उडाली होती.
राज्यात बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचे राडे
