राज्यात एच३एन२चे ३५२ रुग्ण
कस्तुरबा रुग्णलयात स्वतंत्र कक्ष

मुंबई : राज्यात एच३एन२च्या ३५२ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. एच३एन२चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णालयांना अलर्ट राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती सावंतांनी दिली आहे. शिवाय मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात एच३एन२च्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षाची सोय करण्यात आली आहे.

\’१२ मार्चला मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात ३५२ रुग्णांची नोंद झाली आहे. एच३एन२ दोन दिवसात बरा होतो. आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. ज्या ठिकाणी संशयित रुग्ण आढळून येतील, त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. अंगावर आजार काढू नका, खबरदारी घ्या. ताप असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले.

सध्या देशात एच३एन२ या विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे. दरम्यान अहमदनगरमध्ये एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या २३ वर्षीय तरुणाला इन्फ्लूएंझाची लागण झाली होती. सोबतच त्याला कोरोनाचीही लागण झाली होती. अचानक तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू हा इन्फ्लूएंझामुळे झाला की कोरोनामुळे हे अहवाल आल्या नंतरच कळणार आहे. दरम्यान, नागपुरात इन्फ्ल्यूएन्झामुळे ७८ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृत व्यक्तीची मृत्यूपूर्वी केलेली एच३एन२ ची तपासणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. रुग्णाला ‘क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज’, मधुमेह, उच्च रक्तदाबासारख्या सहव्याधी देखील होत्या. त्यासंदर्भात ‘डेथ ऑडिट’ होणार असून त्यासाठीची समिती त्या संदर्भात अंतिम निर्णय घेणार आहे. त्यानंतरच सदर मृत्यू एच३एन२ मृत्यू म्हणून नोंद होईल.

Scroll to Top