जळगाव – राज्यात काही भागात अवकाळी पाऊस सुरू असतानाच दुसरीकडे काही ठिकाणी उकाडाही वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. शेतमजुराचा शेतात काम करत असताना उन्हाच्या तडाख्यामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा ही घटना घडली आहे. प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण (36) हा शेतमजूर शेतात काम करत असताना त्याला उन्हामुळे चक्कर आली. तो शेतात खाली पडल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. प्रेमसिंग शेतीमजुरीचे काम आणि जेसीबी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेती कामासाठी गेला, मात्र दुपारी शेतात काम करताना त्याला चक्कर आली आणि त्याचा मृत्यू झाला. प्रेमसिंग यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा मोठा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्याने चव्हाण कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
राज्यात उष्माघाताचा पहिला बळी
