*आणखी २ दिवस पावसाचा इशारा
पुणे :
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. कालपासून पुणे, नाशिक, बीड, धुळे अहमदनगरसह अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. नाशिकमध्ये जोरदार गारपीट झाली तर भीमाशंकरमध्ये देखील वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली. या नैसर्गिक संकटामुळे बळीराजावर पुन्हा मोठे संकट ओढवले आहे. काढणीला आलेला गहू, हरभरा, कांदा पिकांचे द्राक्षे, टरबूज या पिकांचे गारपिटीमुळे मोठे नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. दरम्यान राज्यातील काही भागात हवामान खात्याने अजून २ दिवस पावसाचा इशारा दिला आहे.
भिमाशंकर परिसरातील अनेक गावांत सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आवकाळी पाऊस आणि तुफान गारपिट झाली. आंबेगाव तालुक्यातील जांभोरी आसाणे, कुशिरे, अडिवरे येथील डोंगरकड्यावरच्या भागात अचानक वादळी वाऱ्यासह गारपिट झाल्याने उन्हाळी बाजरीसह आंबा आणि जनावरांची खाद्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अहमदनगर शहराला जोरदार गारांनी झोडपून काढले असून जोरदार वारा आणि मुसळधार पाऊस यामुळेच नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली होती. सिन्नर शहरासह तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात भाटवाडी, हरसुले, सोनांबे कोनांबे, डुबेरे, ठाणगाव, पाडळी, भुरवाडी या भागाला अवकाळी आणि गारपीटीचा सर्वाधिक तडाखा बसला. अवकाळी पावसाने झोडपण्याची ही आठवी वेळ असून साथीचे रोग पसरले आहेत.
राज्यात काही भागात मुसळधार पाऊस तर देशात उष्णतेने कहर सुरू केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मध्य आणि पूर्व भारतातील काही भागात कमाल तापमान ३९-४२ डिग्री सेल्सिअस असणार आहे. तसेच उत्तर,पश्चिम भारतातील काही भाग, पश्चिम बंगालच्या काही भाग, ओडिशातील काही भाग, आंध्र प्रदेश , केरळ, जम्मू, पंजाब आणि उत्तर भारतात तापमान हे सामान्यपेक्षा ३-५ डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक असणार आहे.