कराड- रेशननिंग दुकानदारांच्या विविध मागण्यांबाबत प्रशासन गंभीर नसल्याने महाराष्ट्र राज्य रेशन दुकानदार महासंघ व फेडरेशनच्या आदेशानुसार १ नोव्हेंबरपासून रेशन दुकानदार दुकान बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा सातारा जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी दिला.
याबाबत गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी श्रीकांत शेटे यांच्यासह जिल्हा संघटनेचे पदाधिकारी तसेच सातारा तालुक्यातील पदाधिकारी व दुकानदार उपस्थित होते. रेशन दुकानदारांच्या मागण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा १ नोव्हेंबरपासून रेशन दुकानदार धान्य उचल,धान्य वाटप बंद करुन दुकान बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा या निवेदनात दिला आहे. दरम्यान,तालुकास्तरीय संघटनांनी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना निवेदने दिली असून ऐन दीपावलीत होणाऱ्या या आंदोलनामुळे रेशन धान्य वाटप ठप्प होणार आहे.शासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन रेशन दुकानदारांना न्याय द्यावा,अन्यथा जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदार आंदोलनात सहभागी होणार असल्याचे श्रीकांत शेटे यांनी सांगितले.