मुंबई- अन्नधान्य आणि भाजीपाला महागला असताना आता महागाईची झळ बांधकाम क्षेत्रालाही बसली आहे.वर्षभरात इमारत बांधकाम खर्चात ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरातील घरांच्या किमती वाढणार आहेत. या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता असल्याचा निष्कर्ष बांधकाम क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या ‘कॉलिर्स ‘ च्या अहवालातून समोर आला आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये घरांचे अनेक मोठे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पाच्या बांधकामासाठी लागणार्या विविध साहित्याच्या किमती वाढल्या की, त्याचा परिणाम घरांच्या किमतीवरही होतो. त्यामुळे घरांच्या किमतीही वाढतात. पोलाद, अॅल्युमिनियम आणि कामगारांचे वेतन आदी घटकांचा त्यामध्ये समावेश असतो. यातील पोलाद, अॅल्युमिनियमच्या किंमती स्थिर असल्या तरी वर्षभरात कामगारांच्या वेतनात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण बांधकाम खर्च ११ टक्क्यांनी वाढला आहे.त्याचप्रमाणे मुंबईसारख्या शहरात वाळू,विटांच्या किमतीतही मध्यम स्वरुपात वाढ झाली आहे. त्यामुळे या घरांच्या किंमती वाढणार आहेत,असे कॉलिर्स इंडियाचे सीईओ बादल याग्निक यांनी म्हटले आहे.