कोल्हापूर- जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे आता दरवर्षीप्रमाणे यंदाही जवळपास एक लाखावर वाहनांतून ऊसतोडणी वाहतूक होणार आहे.मात्र यंदा क्षमतेपेक्षा जादा ऊस वाहतूक झाल्यास प्रादेशिक परिवहन विभागाकडून दंडात्मक कारवाई तर कमी वाहतूक झाल्यास कारखान्याकडून घेतलेला ॲडव्हान्स न फिटला नाही, तर नुकसान होणार अशा दुहेरी संकटात यंदा ऊस वाहतूकदार सापडले आहेत, अशी माहिती ऊस वाहतूकदार संघटनेचे बाळासाहेब गायकवाड यांनी दिली.
ऊस वाहतूक यंदाच्या हंगामातील कळीचा मुद्दा ठरणार आहे. जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांकडून २६८२ गावांतील ऊसतोडीची वाहतूक होते. त्यासाठी बीड, बार्शी, लातूर, सोलापूर, अक्कलकोट, जत, चिक्कोडी, विजापूर, गोकाक आदी भागांतून मोठ्या प्रमाणात ऊसतोडणी कामगार व वाहतूकदार वाहनांसह येतात. यात ट्रॅक्टर व ट्रकची संख्या सर्वाधिक असते. त्यासोबत कारखान्याकडून बैलगाड्याही ठेकेदारी पद्धतीने ऊस वाहतुकीसाठी लावल्या जातात. मात्र, प्रादेशिक परिवहन विभागाच्या अटीनुसार १० ते १२ टन ऊस गाडीत भरता येतो. मात्र, तेवढ्यात कारखान्याच्या मागणीनुसार उसाची वाहतूक पूर्ण क्षमतेने होऊ शकत नाही. कारखान्यांकडून सात ते आठ लाख रुपये ऊस वाहतुकीसाठी ॲडव्हान्स घेतला जातो. उसाची पूर्णक्षमतेने वाहतूक झाली नाही तर एक ते दोन लाख रुपयांचे नुकसान हंगामात सोसावे लागते. ऊस वाहतुकीसाठी चालकाचे वेतन, डिझेल खर्च, गाडीची झीज, दुरुस्तीचा खर्च द्यावाच लागतो. त्यामुळे वाहतूकदाराला फारसा नफा शिल्लक राहत नाही.