नाशिक- आदिवासी विकास विभागाने पहिली ते चौथीच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक बोलीभाषांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.टप्प्याटप्प्याने ही पुस्तके उपलब्ध होणार असल्याने आता राज्याच्या आदिवासीबहूल भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलीभाषेत शिक्षण मिळणार आहे.
राज्यातील काही आदिवासीबहुल भागांत कोलामी, माडिया, गोंडी, वारली यांसारख्या भाषांचा वापर दैनंदिन व्यवहारात केला जातो. तर या भागातील विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शिक्षण दिले जाते. शैक्षणिक भाषेचा विरोधाभास तसेच मातृभाषेतील बालवाचन पुस्तकांअभावी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात.या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलीभाषेत शिक्षण मिळावे यासाठी केंद्रीय जनजाती कार्य मंत्रालयच्या निर्देशानुसार पहिली ते चौथीच्या मराठी बालभारती क्रमिक पाठ्यपुस्तकांचा महाराष्ट्रातील कोरकू, गोंडी, भिल माथवाडी, मावची, माडिया,कोलामी, भिल बसावे, भिल-भिलावू, वारली,कोकणा/कोकणी, पावरी व कातकरी या १२ बोलीभाषांत अनुवाद करण्यात येत आहे.