मुंबई – मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह राज्याच्या अनेक भागात चांगला पाऊस झाला. मराठवाड्यात मात्र गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराचे पाणी शेतात गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.विदर्भात काल जोरदार पाऊस झाला. यवतमाळ, वर्धा, नागपूर मध्ये जोरदार पाऊस बरसला. आजही अनेक भागात चांगला पाऊस झाला असला तरी जनजीवन पूर्वपदावर आले आहे. मुंबई कोकण व इतर भागात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या. मराठवाड्यात आजही जोरदार पाऊस झाला. छत्रपती संभाजी नगर, बीड, नांदेड, जालना, लातूर, हिंगोली, परभणी व धाराशीव जिल्ह्यातील २८४ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यातील नद्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांना जोडणारे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. जायकवाडी धरण भरले असून त्याच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात पाणी सोडण्यात आले. बीड जिल्ह्यातील मांजरा धरणातील पाणीसाठा ५० टक्के झाला आहे. बीडमधील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. बिदुसरा नदीला पूर आला आहे. जालना जिल्ह्यातील ८ तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. घनसंवगी इथे एक शेतकरी वाहून गेला. परभणी जिल्ह्यातील ५२ पैकी ५० मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. सेलू, जिंतूर व सोनपेठ इथून सैन्य दलाने लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. औंढा नागनाथ येथील पोलिस टॉवर वीज पडल्याने कोसळला सुदैवाने यात कोणाला इजा झाली नाही. लातूर जिल्हयात १० पैकी ६ तालुक्यात जोरदार पाऊस झाला. नांदेड मध्ये ९३ पैकी ४५ मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. नांदेड शहराच्याही अनेक भागात पाणी साचले. उंचाश गावातून कयाधू नदीच्या पुरात अडकलेल्या २५ जणांची एनडीआरएफच्या पथकाने सुटका केली.. नांदेड शहरात १५ निवारा केंद्र उभारण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडवून दिला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वसमत ते उमरा फाटा रोडवर असलेल्या कयाधू नदीवरील पुलाचा काही भाग पडल्याने वसमत ते उंबरा फाटा ची वाहतूक ठप्प झाली. धाराशीव जिल्ह्यात तेरणा नदीला पूर आला असून जिल्ह्यातील सोयाबीन, मका या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |