मुंबई- घाटकोपरमधील पालिकेच्या ६८ वर्षे जुन्या असलेल्या राजावाडी रुग्णालयाचा पुनर्विकास केला जाणार आहे. या पुनर्विकास योजनेवर पालिका प्रशासन तब्बल ७०० कोटी रुपये खर्च करणार आहे.
राजावाडी रुग्णालयाच्या पुनर्विकासाची योजना तयार करण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या सल्लागार कंपनीला १४ कोटी रुपये दिले जाणार आहेत. हा पुनर्विकास करताना रुग्णालयातील खाटांची संख्या ५०० वरून १२०० इतकी केली जाणार आहे. रुग्णालयाचे सध्याचे क्षेत्रफळ १६ हजार ८८३ चौरस मीटर आहे ते १ लाख ४ हजार चौरस मीटर इतके वाढविले जाणार आहे. सल्लागार कंपनीकडून नवीन रुग्णालय इमारतीचा आराखडा,जागेचे सर्वेक्षण,
मातीपरीक्षण,अग्नीशमन यंत्रणा आणि निविदा प्रक्रिया अटी याबाबतची निश्चिती केली जाणार आहे. ही निविदा प्रक्रिया या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल,अशी अपेक्षा पालिकेच्या रुग्णालये पायाभूत सुविधा विभागाचे उपायुक्त संजय कुऱ्हाडे यांनी व्यक्त केली आहे.