राजस्थानात महामार्गावर भीषण अपघात ११ जणांचा मृत्यू! १२ गंभीर जखमी

जयपूर – राजस्थानमधील भरतपूर-आग्रा महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात एका ट्रेलरने रस्त्य़ाच्या कडेला दुरुस्तीसाठी थांबलेल्या प्रवासी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील ११ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये ६ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे. तसेच या अपघातात १२जण गंभीर जखमी झाले. त्यांना भरतपूर येथील आरबीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रवाशांनी भरलेली बस भावनगरहून मथुरेला दर्शनासाठी जात होती. यावेळी बसमध्ये बिघाड झाल्याने ती भरतपूर-आग्रा महामार्गाच्या कडेला दुरुस्तीसाठी थांबवण्यात आली. चालक व त्याच्या साथीदारांसह इतर प्रवासीही बसमधून उतरून रस्त्याच्या कडेला उभे होते. यावेळी भरधाव ट्रेलरने बसला जोरदार धडक दिली आणि बाजूला उभ्या असलेल्या लोकांना चिरडले. यात १२ जणांनी आपले प्राण गमावले. या घटनेची माहिती मिळताच लखनपूर, नादबाई, हलैना, वैर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.
मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी २ लाखांची मदत करण्यात येणार आहे. तसेच जखमींना उपचारासाठी प्रत्येकी ५० हजारांची मदत करण्यात येणार आहे, असे पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top