अलिबाग – बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी, यांच्या कुटुंबियांची आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून 8 तास चौकशी करण्यात आली. ही चौकशी अपूर्ण राहिल्याने उद्याही त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.
राजन साळवी यांची गेल्या सहा महिन्यात 3 वेळा एसीबीने चौकशी केली होती. या चौकशीत त्यांच्याकडून काही कागदपत्रेही घेतली होती. तसेच त्यांचे राहते घर आणि हॉटेल्स याचेही एसीबीच्या अधिकार्यांनी मोजमाप घेतले होते. त्यानंतर आज त्यांच्या कुटुंबाची चौकशी करण्यात आली. यात साळवींची पत्नी अनुजा, मुले अथर्व, शुभम तसेच भाऊ दीपक साळवी या सर्वांना आज अलिबागच्या एसीबी कार्यालयात बोलावण्यात आले होते. तिथे सलग 8 तास त्यांच्या मालमतेविषयी त्यांची चौकशी करण्यात आली. एसीबी अधिकार्यांचे एक पथक मालमत्तेशी संबंधित अनेक प्रश्न त्यांना विचारीत होते असे समजते.
यावेळी राजन साळवी हेसुद्धा एसीबी कार्यालयात उपस्थित होते. उद्या पुन्हा साळवी कुटुंबियांची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान ही चौकशी म्हणजे राजन साळवी यांचे हेतूपुरस्सर खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे, असे अनुजा साळवी यांनी सांगितले.
राजन साळवींच्या कुटुंबियांची 8 तास चौकशी
