पुणे – राजगुरूनगरमध्ये काल दुपारी खेळताना दोन लहानग्या बहिणी बेपत्ता झाल्या होत्या. रात्री उशिरा या दोन चिमुकल्यांचे मृतदेह एका इमारतीवर पाण्याच्या पिंपात सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृत मुलींच्या शेजारी राहणाऱ्या दास नावाच्या ५० वर्षीय आचाऱ्याने त्यांची हत्या केल्याची माहिती आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. कुटुंबातील सदस्य आणि गावकर्यांनी या घटनेनंतर खेड पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या देऊन आंदोलन केले.
काल दुपारी कार्तिकी मकवाने (९) व दुर्वा मकवाने (८ )या दोघी बहिणी घराजवळ खेळत होत्या. दासने दोन्ही मुलींना गोड बोलून त्याच्या घरात नेले. त्यानंतर एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने विरोध करून आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. दासने आपले कृत्य उघडकीस येणार या भीतीने तिची गळा दाबून हत्या केली. तर दुसऱ्या बहिणीने सर्व पाहिले असल्याने ती हे तिच्या आईवडिलांना सांगणार या भीतीने तिचीही हत्या केली. त्यानंतर त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने जवळच्या इमारतीत असलेल्या पाण्याच्या पिंपात दोन्ही मृतदेह टाकले. दुपारी दोन्ही मुली बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने राजगुरूनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्या अनुषंगाने खेड पोलिसांनी तपास सुरु केल्यावर रात्री उशिरा पाण्याच्या पिंपात दोन्ही मुलींचे मृतदेह आढळले.
याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. तर मुलींचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. मृत मुलींच्या कुटुंबाने आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.