नवी दिल्ली – भाजपाने आज संसदेच्या बाहेर काँग्रेसविरोधात सकाळीच आंदोलन सुरू केले. काँग्रेसच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सतत अपमान करते, असे म्हणत भाजपा खासदारांची घोषणाबाजी सुरू झाली. त्यांच्या समोरच संसदेच्या बाहेर काँग्रेसचे खासदार आंदोलन करीत अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याबद्दल त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत घोषणाबाजी करत होते. काही वेळाने काँग्रेसचे खासदार संसदेत प्रवेश करण्यासाठी पुढे आले तेव्हा भाजपा खासदारांनी संसदेच्या पायर्यांवर त्यांना अडवले. त्यानंतर खासदारांमध्ये अत्यंत अशोभनीय प्रकार घडला. दोन्ही पक्षांच्या खासदारांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. यात भाजपाचे दोन खासदार जखमी झाले, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे खाली पडले. हा प्रकार येथे संपला नाही. दोन्ही पक्षांच्या खासदारांनी लोकसभा आणि राज्यसभेत एकमेकांवर आरोप करीत गदारोळ घातला. त्याचवेळी भाजपा आणि काँग्रेसचे खासदार संसदीय पोलीस स्थानकात पोहोचले आणि दोघांनी एकमेकांविरोधात गंभीर तक्रारी केल्या. काँग्रेसने भाजपा खासदारांवर धक्काबुक्की करून खरगे यांना पाडल्याचा आरोप केला. तर भाजपा खासदारांनी दोन पावले पुढे जाऊन राहुल गांधी यांच्यावरच हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा कलम 109 चा गुन्हा नोंदवला. इतकेच नव्हे तर भाजपाच्या नागालँडच्या महिला खासदार फांगनोन कोन्याक यांनी राहुल गांधी यांनी अतिशय निकट येऊन असभ्य वर्तन केल्याचा धक्कादायक आरोप केला. संसदेतील हा घृणास्पद प्रकार सुरू असतानाच मुंबईत भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पालिकेसमोरील काँग्रेस कार्यालय गाठले. तेथील पोस्टरवर शाई फेकली आणि कार्यालयात घुसून दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. यामुळे भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. सुदैवाने पोलीस वेळीच दाखल झाले आणि त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना लाठीमार करून त्यांना हुसकावून लावले. भारतात असा प्रकार यापूर्वी कधीही घडला नव्हता. आमदार आणि खासदार पातळी सोडून बोलत आहेत आणि वागत आहेत ही बाब जनतेला अजिबात मान्य नाही.
आज सकाळी काँग्रेसने संसदेच्या मकर द्वाराजवळ रोजच्या प्रमाणे आंदोलन सुरू केले. अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी ते करत होते. त्यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र आज काँग्रेसप्रमाणे भाजपानेही आंदोलन सुरू केले. मकर द्वाराच्या समोरच्या बाजूला भाजपानेही सकाळपासून आंदोलन छेडले. भाजपाचे खासदार मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. काँग्रेस पक्ष सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करतो अशा घोषणा देत भाजपाचे आंदोलन सुरू होते. काही वेळाने काँग्रेसचे खासदार संसदेत प्रवेश करण्यासाठी त्याच मकर द्वारातून पुढे आले. ते संसदेपर्यंत पोहोचले तेव्हा भाजपाचे खासदार संसदेच्या पायर्यांवर उभे होते. त्यांनी काँग्रेस खासदारांना संसदेत प्रवेश करण्यापासून रोखले. यावेळी जोरदार धक्काबुक्की झाली. या धक्काबुक्कीत भाजपाचे ओडिशाचे खासदार प्रताप सारंगी यांच्या डोळ्याला दुखापत झाली. तर दुसरे भाजपा खासदार उत्तर प्रदेशचे मुकेश राजपूत यांच्या डोक्याला दुखापत झाली. प्रताप सारंगी यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राहुल गांधी त्यांच्याकडे गेले तेव्हा भाजपा आणि तेलगू देसमच्या कार्यकर्त्यांनी चढ्या आवाजात राहुल गांधी यांनाच दोषी ठरवले. तेव्हा राहुल गांधी तिथून निघून गेले. प्रताप सारंगी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राहुल गांधी यांनी मागच्या एका खासदाराला ढकलले. तो खासदार माझ्यावर पडला आणि त्यामुळे मला जखम झाली. भाजपाचा दुसरा खासदार मुकेश राजपूत यानेही राहुल गांधींनाच दोषी ठरवले. भाजपाच्या वर्तनाबाबत मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली. त्यानंतर भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर आणि बान्सुरी स्वराज यांनी संसद पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली की, राहुल गांधींनी हल्ला केला. त्यांनी काँग्रेस खासदारांना चिथावणी दिली. राहुल गांधींवर कलम 109 (हत्येचा प्रयत्न), कलम 125 (जीवाला धोका निर्माण करणे), कलम 115, कलम 117 या कलमांतर्गत भाजपाने गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी भाजपाच्या नागालँडच्या महिला खासदार फांगनोन कोन्याक यांनी राज्यसभेत राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार करीत म्हटले की, राहुल गांधी हे माझ्या अतिशय निकट आल्याने मला अस्वस्थ वाटले. ते माझ्या निकट येऊन माझ्याशी मोठ्या आवाजात बोलले. यामुळे मला संरक्षण मिळावे. भाजपाकडून राहुल गांधींवर चहूबाजूने अशा तक्रारी केल्या जात असतानाच काँग्रेसचे प्रतिनिधी खासदारही पोलीस स्टेशनला पोहोचले आणि त्यांनी भाजपा खासदारांविरोधात तक्रार केली. याबाबत सांगताना काँग्रेसचे खासदार दिग्विजय आणि मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, आम्ही मकर द्वारासमोर आंदोलन करीत होतो. अदानी विरोधात आम्ही आवाज उठवत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अमित शहा यांनी जे वक्तव्य केले त्याबद्दल त्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे. आम्ही आंदोलन करून संसदेत जाण्यास पुढे आलो तेव्हा भाजपा खासदार दांडके घेऊन उभे होते. प्रियंका गांधी आणि आमच्या महिला खासदार आल्या तेव्हा केंद्रीय सुरक्षा दलाने त्यांचा मार्ग अडवला. सुरक्षा दलाला संसदीय नियमांची माहिती नसावी. त्यानंतर भाजपा खासदारांनी आम्हाला रोखले आणि धक्काबुक्की केली. मल्लिकार्जुन खरगे हे 84 वर्षांचे आहेत. त्यांच्या दोन्ही गुडघ्यांवर शस्त्रक्रिया झाली आहे. या धक्काबुक्कींमुळे ते खाली पडले आणि त्यांना इजा झाली. याबाबत आम्ही पोलिसांकडे तक्रार केली आहे.
या सर्व गोंधळानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज आजच्या दिवसासाठी तहकूब झाले. त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. मल्लिकार्जुन खरगे यांनी घटनाक्रम सांगितला. त्यानंतर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, आम्ही सातत्याने अदानीबाबत सवाल विचारत आहोत. अमेरिकेच्या न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले आहे. अदानीबाबत आम्ही उत्तर मागत असताना भाजपा उत्तर देण्यास तयार नाही. या गंभीर विषयावरून लक्ष हटविण्यासाठी ते रोज नवनवीन युक्ती करत असतात. अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. याबद्दल त्यांनी माफी मागावी अशी आम्ही मागणी केली. मात्र माफी न मागता त्यांनीच पुन्हा दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी आजचा प्रकार केला आहे.
दिल्लीत हा सर्व प्रकार घडत असताना मुंबईत त्याचे पडसाद उमटले. भारतीय युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर हल्ला करीत दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या पोस्टरवर शाई फेकली. यावेळी भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर पोलिसांनी येऊन लाठीमार करत भाजपाच्या कार्यकर्त्यांना तेथून हटविले. या सर्व घटनांचे पडसाद पुढील काही दिवस निश्चितपणे उमटणार आहेत.