नवी दिल्ली- रस्ते अपघातातील जखमींवर आता कॅशलेस पद्धतीने उपचार होणार आहेत. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत दीड लाखांपर्यंत हे उपचार केले जाणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत या योजनेची माहिती दिली. ही योजना सध्या प्रायोगिक तत्वावर चंदीगड आणि आसाममध्ये राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, रस्ते वाहतूक मंत्रालय यांच्यावतीने सुरू झाली आहे.
वाहनामुळे कोणत्याही रस्त्यावर अपघात झाला असेल तरीही कॅशलेस उपचार मिळणार आहेत. लाभार्थींवर ट्रॉमा आणि पॉलिट्रॉमा संबंधित उपचार नोंदणीकृत हॉस्पिटलमध्ये केले जातील. जास्तीजास्त दीड लाखापर्यंतचा खर्च यात अंतर्भूत आहे. अपघात झाल्यानंतर सात दिवसांच्या झालेल्या उपचारांचा खर्च केला जाईल. यासाठी मंत्रालायने मोटार वाहन अपघात निधी स्थापन केली आहे, त्यातून हा उपचाराचा खर्च केला जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, रस्ते वाहतूक मंत्रालय, स्थानिक पोलिस, नोंदणीकृत हॉस्पिटल, राज्य सरकारची आरोग्य यंत्रणा, जनरल इन्शुरन्स काऊन्सिल यांच्या समन्वयातून या योजनेची अंमलबजावणी केली जाईल.