मुंबई – आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने क्लीन चिट दिली. त्यांच्याविरुद्ध दाखल दोन्ही एफआयआर रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यात एक एफआयआर पुणे आणि दुसरा एफआयआ मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. राज्य गुप्तचर विभागात कार्यरत असताना शुक्ला यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप झाला होता.
या प्रकरणी शुक्ला यांच्याविरोधात मविआ सरकारच्या काळात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबईत खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. पुण्याच्या प्रकरणात पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दिला होता, तर कुलाबा प्रकरणात राज्य सरकारने पुढे जाण्यास नकार दिला. त्यामुळे आज न्यायालयाने दोन्ही एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले.न्यायालयाच्या या निर्णयामुळे शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला आहे.