नागपूर- काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वे यांचे जातप्रमाणपत्र वैधच असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय बेकायदेशीर असून तो रद्द करण्यात यावा, अशी विनंती राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती.
लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी जातवैधता समितीने बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द केले होते. त्यामुळे रश्मी बर्वे यांना लोकसभा निवडणूक लढवता आली नाही. पुढे बर्वे यांनी जातवैधता समितीच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. मुंबई उच्च न्यायालयाने बर्वे यांनी सादर केलेले दस्तऐवज तपासून त्यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरविले. मात्र राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्याने राज्य सरकारला दणका दिला आहे.