किव – गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध निवळण्याचे चिन्हे दिसत नाही. शुक्रवारी पूर्व युक्रेनमधील स्लाव्हियान्स्क शहरातील निवासी भागावर रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केला. या क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान आठ नागरिक ठार झाले आहेत. डोनेस्क प्रदेशाचे गव्हर्नर पावलो किरिलेन्को यांच्या हवाल्याने ‘अल जझीरा’ने ही माहिती दिली आहे.
रशियाने बाखमुट शहराच्या पश्चिमेकडील स्लोव्हियनस्क येथे सात रशियन एस-३०० क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात २१ जण जखमी झाले, तर आठजण मृत्युमुखी पडले आहेत. युक्रेनियन पोलिसांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, एका तरुणाचा ढिगाऱ्यातून बाहेर काढल्यानंतर रुग्णवाहिकेत मृत्यू झाला.
मागील २४ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धात अनेकांचा बळी गेला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या युरोपमधील सर्वात मोठ्या संघर्षाने लाखो लोकांना विस्थापित केले आहे. युक्रेनमधील अनेक शहरे, गावे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे या देशाची आणि जागतिक अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे.