किव्ह
रशियाने युक्रेनवर सर्वांत मोठा ड्रोन हल्ला केला. किव्ह येथे स्थापना दिन साजरा करण्याची तयारी सुरु असताना रशियाने हा हल्ला केला. या हल्ल्यात एकजण मृत्युमुखी पडला. २७ मे रोजी रात्री रशियाने इराणी बनावटीच्या शाहेद ड्रोनने हल्ला केला, अशी माहिती युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्याने दिली. सुमारे पाच तास सुरू असलेल्या या हल्ल्यात ४० पेक्षा अधिक ड्रोनचा वापर करण्यात आला.
या हल्ल्यामुळे सातमजली इमारत कोसळली. यात एका ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तर एक ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. यावेळी रशियाने एकूण ५४ ड्रोन सोडले. त्यापैकी ५२ ड्रोन हवेतच निकामी केल्याचा दावा युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने केला. युक्रेनच्या ईशान्येकडील खारकिव्ह प्रांतात तोफगोळ्यांच्या माऱ्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. यात एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. दरम्यान, फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू केल्यापासून सीमावर्ती प्रदेशांत ड्रोन हल्ले होतच आहेत. गेल्या महिन्यापासून या हल्ल्यांत वाढ झाली आहे. या ताज्या हल्ल्यामुळे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.