मुंबई – मुंबई आणि उपनगरातील रेल्वे रुळांची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने उद्या रविवारी म्हणजेच २३ एप्रिलला तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे ऐन सुट्टीच्या दिवशीच मुंबईतील प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार असून प्रवाशांना प्रवासासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी-वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. याशिवाय चुनाभट्टी-वांद्रे-छत्रपती सीएसटी-अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वेकडून माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मुंबईतील सीएसटीहून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ या वेळेत सुटणाऱ्या रेल्वेगाड्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या लोकल गाड्या शीव,कुर्ला,घाटकोपर, विक्रोळी,भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबणार आहे. धिम्या मार्गावरून धावणाऱ्या या गाड्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशीराने धावणार आहे. ठाण्याहून धीम्या मार्गावर धावणाऱ्या रेल्वे अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे.
सीएसटीहून-वडाळा-वाशी-बेलापूर-पनवेल-वांद्रे-गोरेगावकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील लोकल सेवा रविवारी रद्द राहतील. मेगाब्लॉकच्या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष लोकल सेवा चालवल्या जाणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी असेल.तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर मुंबई सेंट्रल ते माहीम अप जलद मार्गावर शनिवारी रात्री १२ ते पहाटे ४ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.त्यामुळे अंधेरी ते सांताक्रूझ दरम्यान जलद लोकल सेवा अप धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे.