मुंबई- प्रसिद्ध ‘शोले’ चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि त्याचा पुतण्या सुनील सिप्पी आणि इतर १२ जणांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू आहे. या मालमत्तेच्या वादावर तोडगा काढण्यासाठी आता हे प्रकरण मध्यस्थाकडे पाठविण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने निवृत्त न्यायमूर्ती एस.जे. काठावला यांनी ‘मध्यस्था’ ने सिप्पी कुटुंबीयांनी सामोपचाराने तोडगा काढून वाद मिटवावा, असा सल्ला दिला. अल्ट्रामाऊंट रोड येथील श्री विजय भवनमधील दोन फ्लॅटशी संबंधित हा वाद असून प्रसिद्ध चित्रपट निर्माते जी. पी. सिप्पी यांच्या मालमत्तेमध्ये या दोन फ्लॅटचा समावेश होता. फ्लॅटवर हक्क सांगत रमेश सिप्पी यांनी २०२३ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या सुनावणीवेळी चित्रपट निर्माते जी.पी.सिप्पी यांच्या मालमत्तेत चार मुलांचा मालमत्तेच्या एक-पंचमांश हिस्सा मिळण्याचा हक्क आहे, असे असताना सुरेश सिप्पी यांचा मुलगा सुनील सिप्पी आणि कुटुंबाने फ्लॅट बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले आहेत, असा दावा रमेश सिप्पी यांनी केला. यावेळी खंडपीठाने याचिकेची दखल घेत सिप्पी कुटुंबीयांतील मालमत्तेचा वाद ‘मध्यस्था’ मार्फत सोडवण्याची सूचना केली. त्यानुसार प्रकरण निवृत्त न्यायमूर्ती काठावाला यांच्याकडे वर्ग करताना चार आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. मध्यस्थीचा प्रयत्न अयशस्वी झाला तर अन्य पर्याय विचारात घेण्याच्या दृष्टीने न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ फेब्रुवारी रोजी निश्चित केली.