रत्नागिरी- तालुक्यातील भाट्ये,गणपतीपुळे, गावखडी आणि राजापूर तालुक्यातील वेत्ये अशा चार समुद्र किनारी मिळून आॅलिव्ह रिड्ले कासवाची ७०० अंडी संरक्षित करण्यात आली आहेत.त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत अंड्यांतून पिल्ले बाहेर येऊन ती समुद्रात सोडण्यात येणार आहेत. बदलत्या वातावरणामुळे यावर्षी विणीचा हंगाम उशिरा सुरू झाला आहे.
सहा वर्षांपूर्वी रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर वनविभाग,ग्रामपंचायत व प्राणीमित्रांनी कासवाची अंडी संरक्षित करण्याचे काम हाती घेतले होते. जिल्ह्यातील गुहागर, वेळास,दापोली किनाऱ्यावरही कासवाच्या अंड्याचे संरक्षण केले जाते. त्यातील वेळास येथील संवर्धन केंद्राच्या ठिकाणी कासव महोत्सवही भरवला जातो. यावेळी अनेक पर्यटक कासव संवर्धन केंद्राला आवर्जून भेट देतात. सध्या भाट्ये येथे एक, गावखडीत तीन, वाडा वेत्ये येथे तीन, गणपतीपुळे येथे एक घरटे संरक्षित करण्यात आले असून त्यामध्ये एक हजार अंडी आहेत. गावखडी किनाऱ्यावर दरवर्षी कासवाच्या अंड्यांची घरटी मिळण्याचे प्रमाण जास्त आहे.गेल्या वर्षी येथे सुमारे १३ घरटी संरक्षित करण्यात आली होती.